'ठाकरेंना टायमिंग जमतं . कुठं बोलावं , किती बोलावं, काय बोलावं आणि कधी बोलावं ह्याचे टायमिंग ठाकरेंना जमतं .' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी स्वतःच एकदा हे गुपित सांगितले होते . तर हे असेच होते... अचानक साहेबांची आठवण येते . स्मृती जागृत होतात . त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते . आयुष्याचा अर्धाधिक काळ साहेबांच्या प्रभावाखाली गेला असल्यामुळे असेल कदाचित पण येते साहेबांची आठवण ! आता साहेब नाहीत आणि त्यांची शिवसेनाही उरली नाही .कुणी वेगळेच 'साहेब' आजकाल शिवसेनेवर अधिकार गाजवीत आहेत, असे म्हणतात . हे 'साहेब' स्वतःला 'राष्ट्रवादी' म्हणवून घेतात असेही ऐकीवात आहे .तर हे नवीन 'साहेब' शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून त्यांचा 'राष्ट्रवादी' अजेंडा राबवून घेतात ...रेटतात असा समज निर्माण होऊ लागला आहे .साहेबांनी कधीही केले नसते अशा प्रकारची सर्व कामे हे राष्ट्रवादी साहेब पक्षप्रमुख सरकारकडून सहजपणे करून घेतात .
१९९५-९९ या काळातील शिवसेनेच्या मनोहर जोशी सरकारच्या काळात साहेबांचा रिमोट 'मातोश्री' वरून चालायचा आता 'मातोश्री' वरील पक्षप्रमुख रिमोटचे बटण घेऊन पेडर रोड वरील एका बंगल्यात जाताना दिसतात .खरे-खोटे अल्ला जाणो पण मुंबईचे शिवसैनिक सुद्धा तिकिटासाठी तिकडेच रांगा लावण्याचा विचार करू लागले असल्याची चर्चा आहे . एकोणाविसाव्या शतकातील जर्मन विचारवंत येथे उगाच आठवला . नित्शे (Nietzsche) त्याचे नाव. तर तो म्हणतो, प्रत्येक माणूस एका भ्रमात जगत असतो. तुम्ही त्याचे भ्रम नाहीसे करू नका . तो वेडा होईल . म्हणून थांबलेले बरे ...
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाआघाडीचे हे सरकार आहे म्हणजे सरकारमध्ये शिवसेनाही आहे . अल्प का असेना , आहे .ज्या परिस्थितीत राजकारण झाले त्याचे अपरिहार्य पडसाद सत्तेच्या राजकारणात उमटतात , ते उमटत आहेत . कुणाला रागही नाही .खंत तर नाहीच नाही . सारे कसे भुजबळ झाले आहेत . म्हणजे भुजबळ नाही का दम देत ,'भ्रष्टाचार सहन करणार नाही, तसे झाले आहे . कुणीही काहीही करा-बोलायला मोकळा !
रागावरून आठवले , १९८८ च्या मार्च-एप्रिल मधील एक आठवण . गोष्ट तशी साधीच आहे ...डोंगराएव्हढी .! तेव्हा खरी शिवसेना होती . शिवसैनिक कसा विस्तवा सारखा असावा , साहेब म्हणायचे . तर तसा होता .. विस्तवासारखा . सत्तेची आशा नव्हती पण मनामनात आग होती . तर औरंगाबाद मनपाची पहिली निवडणूक होती . साहेबांचे रेखाचित्र असलेले पोस्टर मुंबईवरून आले होते .'एकदा शिवसेनेला संधी द्या . आम्हीही नालायक निघालो तर भविष्यात पुन्हा आमचा विचारही करू नका ' अशा आशयाचा मजकूरही त्यावर होता . झालं असें की , जवाहर कॉलनी भागातील शिवशंकर कॉलनीत आमच्या सुंदर (लटपटे) चे विद्यार्थीमित्र त्याभागात रूम घेऊन राहात होते .त्या दोन विद्यार्थ्यांनी रूममध्ये ते पोस्टर लावले होते आणि सहज चाळा म्हणून साहेबांचे चित्र पेनने रंगवले...चित्राला दाढीमिश्या लावल्या , ही बाब परिसरातच राहणाऱ्या राधाबाई तळेकर ह्यांना समजली मात्र ... त्या दोन्ही मुलांना बाईंनी धु धु धुतले .ते बिचारे कसेबसे तेथून पळून गेले .रूम उघडी ठेवून .... घाबरलेल्या पोरांनी रात्र विमानतळावर काढली .सुंदरने हा सारा प्रकार सांगून प्रकरण मिटवून टाकण्यासाठी गळ घातली. राधाबाईंना मी समजावून सांगितले .प्रकरण शांत केले म्हणा ... शिवसेना तेव्हा जीवंत होती ती अशी !
शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात 1१९८६ -१९९० पर्यंत अनेक आंदोलने झाली .रेल्वे आंदोलन, वैधानिक विकास मंडळाच्या मागणी साठी, कत्तलखाना हटवण्यासाठी अशी अनेक आंदोलन शिवसेनेने केली .'रिडल्स" चा मोर्चा तर सर्वश्रुत आहे तर अशा अनेक प्रसंगी शिवसैनिकावर गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत .आजही त्या संदर्भात कोर्ट-कचेऱ्या सुरू आहेत .तेव्हाच्या नेतृत्वाने तर रासुका भोगला .अटका, तुरंगवाऱ्या तर सर्वांच्याच वाटेला आल्या होत्या काहींना तडीपारी सुद्धा सहन करावी लागली .आजही काही प्रकरणामध्ये कोर्टवाऱ्या करू करू जीव जाण्याची वेळ आलेली आहे ....या पार्श्वभूमीवर परवाच राष्ट्रवादी साहेबांनी रिमोट चालवून मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव दंगलीतील गुन्हे वापस घेतले आहेत .... शिवसैनिकांवरील गुन्ह्यांचे , खटल्याचे काय ? त्याबद्दल एक अवाक्षर नाही .राज्यात शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखलील सरकार आहे पण सत्तेत शिवसेना कुठे दिसत नाही ,असा विचित्र प्रकार आहे ."जैसा कर्दमी …रुतला ! राजहंसु ! ... हंस हा अत्यंत शुद्ध पक्षी आहे .त्याला अपवित्रता खपत नाही . तो आहे पांढराशुभ्र .नेहमी मानससरोवरात विहार करतो.तेथे चिखल नाही , आहे ते स्वच्छ बर्फ़ाचे नितळ पाणी...असा हा राजहंस जर चिखलात अडकला तर त्याची काय अवस्था होईल ? सत्तेच्या चिखलात संघटना अडकलेली असल्यामुळे शिवसैनिकांची अवस्था त्या राजहंसाप्रमाणे झाली आहे ... फारतर साहेबांच्या शिवसैनिकांची म्हणा !